Wednesday, 29 November 2017

शेतक-यांसाठी खूशखबर, राज्यात वन शेती उपअभियान; शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान

शेतक-यांसाठी खूशखबर, राज्यात वन शेती उपअभियान; शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान
शेतीतील उत्पादनासह वृक्ष लागवड वाढवण्यासाठी केंद्राने सुरू केलेल्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत राज्यात वन शेती उपअभियान राबवण्यास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. वनशेतीला प्रोत्साहन व शेती फायदेशीर करण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरेल. तसेच शेतकऱ्यांना खर्चाच्या ५० टक्के अनुदानही मिळणार आहे. या अभियानासाठी २०१७- १८ या आर्थिक वर्षामध्ये सुमारे ८ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

वृक्षतोड व लाकूड वाहतुकीचे नियम शिथिल करणाऱ्या राज्यांत हे उपअभियान राबवण्यात येते. यामुळे वातावरणातील बदल, पावसाच्या लहरीपणामुळे जोखमीचा झालेला शेती व्यवसाय शाश्वत करण्यासह शेतीची उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न यामध्ये वाढ करणे व सातत्य ठेवणे शक्य होणार आहे. वनशेतीमुळे नैसर्गिक साधनांचे संवर्धन होऊन वातावरणातील बदल काही प्रमाणात सौम्य होऊ शकेल. तसेच कृषीआधारित उपजीविकेसाठी नवीन स्रोतांची निर्मिती आणि उत्पादनात वाढ होण्यासही मदत होऊ शकते.
अभियानाची वैशिष्ट्ये
अल्प-अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, उत्पन्न आणि उपजीविकेचे साधन निर्माण करणे, पिके आणि पशुधन यासोबतच वृक्षारोपणास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. वृक्षारोपणासाठी दर्जेदार बियाणे, नवीन रोपे, क्लोन्स, हायब्रीड, सुधारित जाती उपलब्ध करून देण्यात येतील. विविध विभागांतील कृषीविषयक वातावरण आणि शेतजमिनीच्या स्थितीनुसार वनशेतीची पद्धत किंवा मॉडेल्स विकसित करण्यात येणार आहेत. वनशेती क्षेत्रात विस्तार आणि क्षमतावृद्धी करण्यासह वनशेतीबाबतची माहिती शेतकऱ्यांना करून देण्यात येणार आहे.

INDRAPRASTH AGRO TECH

No comments:

Post a Comment