Tuesday, 17 October 2017

राज्यातील पहिली महिला शेतकरी उत्पादक कंपनी ;- जीवनसंगिनी कृषी विकास महिला शेतकरी उत्पादक कंपनी

राज्यातील पहिली महिला शेतकरी उत्पादक कंपनी


शेतमाल विकणे आता शेतक-यांसाठी सुखकर झाले जीवनसंगिनी कृषी विकास महिला शेतकरी उत्पादक कंपनी,तळणी,जिल्हा- बुलढाणा

पार्श्वभूमी:
शेती क्षेत्रापुढे अनेक आव्हाने आहेत यातील सर्वात महत्वाचे म्हणजे भांडवलाची उपलब्धता, कृषि तंत्रज्ञान, निविष्ठा आणि उत्पादित कृषी मालाची विक्री होय. 12 व्या पंचवार्षिक योजने अंतर्गत कृषि क्षेत्राच्या सर्वांगिण विकास साधण्यासाठी शेतक-यांच्या उत्पादक कंपन्यांना उत्तेजन देऊन त्यांचे बळकटीकरण करणे हे एक महत्वाचे धोरण केंद्र शासनाने ठरविलेले आहे. शेतक-यांना त्यांचे सामुहिक उत्पादन आणि विक्रीसाठी संघटित करण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे त्यांची कंपनी कायदा 1956 च्या विशेष तरतुदी अंतर्गत नोंदणीकृत उत्पादक संस्था स्थापन करणे होय. शेती क्षेत्राच्या विकासासाठी शेतकरी सदस्यांच्या उत्पादक संस्थांना सहाय्य करणे व अशा उत्पादक संस्थांच्या सामूहिक कृतीतून शासनाच्या सहकार्याने साधनसामुग्रीच्या शाश्वत उपयोगातून उत्पादकता वाढ व उत्पादन खर्च कमी करुन उत्पादित मालास अधिक भाव मिळवून देणे या बाबींचा धोरणामध्ये समावेश आहे. शेतकर उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतक-यांची व्यवहारशक्ती वाढविणे, जेणेकरुन त्यांना निविष्ठा व तंत्रज्ञानाची उपलब्धता, बाजारभाव निश्चित करणे, खाजगी कंपनी बरोबर करार करणे, मुल्यवर्धीत बाजारात सहभागी होणे यासारखे इतर अनेक फायदे करुन घेता येतात, की जे एका वैयक्तिक शेतक-यास सहज उपलब्ध होणे कठीण आहे. तसेच या माध्यमातून विभिागलेल्या व अत्यंत कमी जमीन धारण क्षेत्र असलेल्या शेतक-यांना गटाचे फायदे व मालकी व्यक्तीगत होवून एकत्रित नियोजन, निविष्ठा खरेदी व पणन इत्यादीचे फायदे घेता येतात. राज्यातील अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या यशस्वीपणे वाटचाल करीत शेतक-यांना प्रगतीकडे नेत आहेत. कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, तळणी, ता.मोताळा,जि.बुलढाणा या संस्थेच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्हयातील मोताळा तालुक्यामधील फक्त महिला शेतकरी सभासदांची "जीवनसंगिणी कृषी विकास महिला शेतकरी उत्पादक कंपनी” तळणी स्थापन केली आहे.महिला शेतक-यांची राज्यातील या पहिल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीची वाटचाल अतिशय प्रेरणा देणारी असून त्यांच्या कामगिरीचा आलेख येथे थोडक्यात देण्यात येत आहे.

गटांची स्थापना:
कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, तळणी, ता.मोताळा,जि.बुलढाणा या संस्थेने निवडलेले 12 गावे ही 12 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर असणारी खेडी आहे. त्यामुळे येथील भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीमध्ये साधर्म्य आहे. तसेच इथल्या पीकनिहाय पध्दती, उपलब्ध बाजारपेठ, बाजारभाव, पाण्याची उपलब्धता, पाण्याचे स्त्रोत, (पर्याय व्यवस्था) शेतीविषय गरजा ज्यामध्ये निविष्ठा, अवजारे, यंत्रे या सर्व गरजा मोठया प्रमाणात सारख्याच स्वरुपाच्या आहेत. या गावातील महिला शेतक-यांचे प्रत्येकी15 ते 20 महिला सभासद असणारे गट स्थापन करुन संस्थेने एका गावामध्ये 3 ते 4 असे एकूण 59 शेतकरी गट स्थापन केले आहेत. यामध्ये एकूण 1113 महिला सभासद आहेत. प्रत्येक गटामध्ये एक समन्वयक व एक कंपनी प्रतिनिधी निवडण्यात आला. या गटांच्या महिन्याला नियमित बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये शेतीविषयक चर्चा करण्यात येते. या चर्चा मधूनच शेतीसंबंधी अडचणी,गरजा लक्षात येवू लागल्या. त्याचबरोबर त्यावर उपाय शोधण्यात आले.

भागभांडवल उभारणी :
कंपनी स्थापन केल्यानंतर पुढे कंपनी चालविण्यासाठी भांडवलाची गरज असते.भांडवल उभारणीसाठी भागभांडवल (शेअर्स) उभारण्यात आले. एका शेअर्सची किंमत रु.10 ठेवण्यात आली.यामधून रुपये 310150/- भांडवल जमा करण्यात आले. कंपनी चालविण्यासाठी संचालक मंडळाची क्षमताबांधणी करणे फारच गरजेचे होते त्यासाठी कंपनीचे प्रशासकीय व आर्थिक व्यवस्थापन,व्यवसाय आराखडा तयार करणे,तसेच कंपनीच्या उत्पन्न वाढीसाठी नवनवीन व्यवसाय निवडणे याचे मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याने विविध प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. कंपनीच्या व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासू लागली.त्यासाठी काही कंत्राटदारी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली. या कर्मचा-यांच्या माध्यमातून संचालक मंडळ कंपनीचा कारभार पाहू लागले. कंपनी चालविण्यासाठी लागणारे आवश्यक परवाने मिळविण्यात आले.कंपनीच्या महिला सभासद यांनी जीवनावश्यक वस्तु पुरवठा साठीच्या अन्न व औषध विभागाकडून परवाना काढला आहे. शेतमालाची खरेदी/विक्री साठी कृषी उत्पन्न बाजार समिती परवाना, व खते औषधी बियाणे विक्री परवाना प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

क्षमता बांधणी: :
पिक प्रात्यक्षिके आणि शेतकरी प्रशिक्षण :
यामध्ये क,षी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांचे तांत्रिक मार्गदर्शनाखाली उडीद,मुग,तुर,या पिकांचे एकूण 57 पीक प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. याकृषी विज्ञान केद्राच्या मार्गदर्शनाखाली आणि शेतक-यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यामध्ये गांडुळ खत,कंम्पोस्ट खत,मातीपरिक्षण,एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन,एकात्मिक कीड नियंत्रण या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उत्पादन खर्चामध्ये बचत करणे यावर मार्गदर्शन करण्यात आले.अशा प्रकारे वेळोवेळी तज्ञ प्रशिक्षकांच्या सहकार्याने विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून क्षमता बांधणी करण्यात आली.

शेतकरी अभ्यास दौरे:
शेतकरी महिला गटांच्या समन्वयकांना विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास दौरे आयोजित करण्यात आले. राज्यात व राज्याबाहेर विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांना भेटी देण्यात आल्या.जीवनसंगिनी कंपनीच्या संचालकांनी या कंपन्यांच्या संचालक मंडळासमोरील व कर्मचा-यांसोबत चर्चा केली आणि कामकाजाची पध्दत समजून घेतली.

बांधावर खत योजनेतील सहभाग:
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणा-या "बांधावर खत योजना" या उपक्रमातून पेरणीच्या वेळी काही शेतकरी गटांना शेताच्या बांधावर खत उपलब्ध करुन देण्यात आली.त्यामुळे वाहतुकीच्या खर्चामध्ये बचत झाली तसेच पेरणीसाठी वेळेवर खते उपलब्ध झाल्यामुळे शेतक-यांचे कष्ट वाचले. याशिवाय एकत्रित बियाणे खरेदीच्या माध्यमातून शेतक-यांना एकत्रित खरेदीचा फायदा लक्षात आणून देण्यात आला आहे.प्रत्यक्ष उत्पादन खर्च कमी करुन शेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर होईल या दृष्टीने कार्यक्रमाची आखणी करण्यात येत आहे.
सेवा व सुविधा :

महिला शेतकरी उत्पादक सभासदांना कंपनीने उपलब्ध करुन दिलेल्या सेवा व सुविधा पुढीलप्रमाणे आहेत. एकत्रित बियाणे खरेदी कंपनीच्या स्थापनेनंतर गहू व हरभरा बियाणे एकत्रितरित्या खरेदी करुन बाजारभावापेक्षा रु.50 ते 60 इतक्या कमी दरात घरपोच उपलब्ध करुन देण्यात आले.यामध्ये त्यांचा वाहतुकीच्या खर्चामध्ये बचत झाली व वेळही वाचला.कंपनीने एकत्रितरित्या बियाण्याची खरेदी केली आहे व हे बियाणे सभासदांना बाजार भावापेक्षा कमी दराने उपलब्ध करुन दिले आहे.यामध्ये कपाशी,तून,सोयाबीन,ज्वारी,मका,या पिकांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या सार्वजनिक व खाजगी भागीदारी तत्वावरील (PPP) प्रकल्पामध्ये नुजुविडू बियाणे कंपनी सोबज शेतक-यांना कपाशी बियाणे एका कीटच्या स्वरुपात उपलब्ध करुन दिले आहे.यामुळे महिला शेतक-यांच्या खर्चात सुमारे 50 बचत केली.

बाजारभाव कृषि हवामान माहिती सेवा :
रुटर मार्केट लाइट (RML) या कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक गटातील 6 सभासदांना बाजारभाव व कृषि हवामान माहितीची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या.यामुळे पिकाविषयी व बाजारभावाविषयी माहिती सहज उपलब्ध झाली.यासोबतच पिकासंबंधी काही अडचणी असल्यास सफोनद्वारे तज्ञ मंडळीसोबज चर्चा करुन त्याचे निरसन करता येवू लागले.

कापूस खरेदी सुरुवात:
शेतक-यांच्या कापूस विक्री साठी एका जीनिंग युनिट सोबत समन्वय घडवून आणला व बाजारभावापेक्षा रु. 50 प्रती क्विंटल जास्त भाव मिळवून देण्यात आला.

हरभरा खरेदीस सुरुवात :
कृषि मालाचा बाजारभाव हा अस्थिर स्वरुपाचा असतो.त्यावर कायम तेजी मंदीचे सावट असते.हा सर्व बाजार व्यापारी नियंत्रित करतात.त्यामुळे शेतकरी हा हमखास भरडला जातो.ब-याचवेळा शेतकरी जेंव्हा आपला शेतमाल विक्रीसाठी बाजार नेतो,त्याचवेळी बाजारभाव कमी झालेला असतो.त्यामुळे त्याला मिळेल त्या भावावर समाधान मानावे लागते,कारण तो शेतमाल न विकताच घरी परत नेला तर त्यासाठी होणारा वाहतुकीचा खर्च त्याला परवडण्यासारखा नसतो.याबाबींचे गांभीर्य लक्षात घेता कंपनीने फे ब्रुवारी, 2014 मध्ये एनसीडीएक्स (National Commodity & Derivative Exchange) च्या माध्यमातून हरभरा खरेदी केला.कंपनीने रु.3100/- प्रती क्विंटल या हमी भावाने सुमारे कंपनीच्या 292 सभासदांचा एकूण 7345 क्विंटल हरभरा खरेदी केला आहे.बाजारभावापेक्षा सरासरी रु.600/- प्रती क्विंटल इतका शेतक-यांचा फायदा झाला. यामुळे एकूण रु.50 लाख फायदा झाला. या व्यतिरिक्त आडत, तोलाई, हमाली या सर्व खर्चामध्ये बचत झाली.इल्ेक्ट्रॉनिक काटयामुळे योग्य वजन मिळाले. यामुळे व्यवहारात पारदर्शकता येऊन विश्वासार्हता निर्माण झाली.

ऑनलाईन बॅाक सुविधा:
ऑन लाईन बँक सुविधेमुळे शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये वेळेत रक्कम जमा करण्यात येते.विशेष म्हणजे 7 ते 15 दिवसांत रक्कम जमा होते. यामुळे शेतमाल विकणे आता शेतक-यांसाठी सुखकर झाले आहे. कृषी माल विक्रीसाठी काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा अवलंब: शेतमालाला योग्य भाव मिळणेसाठी शेतक-यांनी कोणती दक्षता घ्यायला पाहिजे याबाबत त्यांच्यामध्ये जागृती निर्माण झाली आहे.शेतमालाची प्रतवारी करणे,यंत्राद्वारे साफसफाई करणे,ओलाव्याचे योग्य प्रमाण ठेवणे,योग्य साठवणुक करणे याबाबत त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली आहे. या उपक्रमामधून कंपनीचा उददेश साकार होताना दिसू लागले. त्यामुळे महिला शेतक-यांमध्ये उत्साह संचारला.त्यांनी इतर महिलांना कंपनीमध्ये सभासद होण्यासाठी प्रवृत्त केले. प्रोत्साहित होवून काही महिलांनी अतिरिक्त शेअर्स खरेदी सुध्दा केली.

पशुखाद्य व पुरक आहार व्यवसाय:
बुलढाणा जिल्हयामध्ये मोताळा तालुक्यामध्ये सर्वात जास्त दुध उत्पादन होते.कंपनीच्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये दुग्धव्यवसाय फार मोठया प्रमाणावर करण्यात येतो.शेतक-यांची गरज लक्षात घेऊन कंपनीने पशु खाद्य,कॅल्शिअम व मिनरल पावडर विक्री सुरु केल आहे. बाजार भावापेक्षा कंपनीला 20 टक्क्े सूट मिळते.त्यामध्ये कंपनी आपल्या सभासदांना सूट देत आहे.

महिला शेतकरी उत्पादक कंपनीचा राष्ट्रीय स्तरावर सहभाग :
पार्लमेंट कमिटी ऑन वुमेन एमपावरमेंट :
दिनांक 14 नोव्हेंबर,2014 रोजी मुबई येथे नाबार्डद्वारा जीवनसंगिनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांना पार्लमेंट कमिटी ऑन वुमेन एमपावरमेंट समोर आपल्या कामाचे सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली.समितीने कंपनीचे कामकाज जाणून घेतले व महिला सक्षमीकरणामध्ये उत्पादक कंपन्या कशी भूमिका बजावू शकते याबाबत कंपनीच्या सदस्यांकडून मत जाणून घेतली.

कृषी वसंत प्रदर्शन, नागपूर येथील सहभाग:
उत्पादक कंपनीच्या कामाची शेतक-यांना माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी वसंत नागपूर या प्रदर्शनामध्ये सहभाग.

नॅशनल मायक्रो फायनान्स कॉन्क्लेव,2014 सहभाग:
दिनांक 13 नोव्हेंबर,2014 रोजी मुंबई येथे नाबार्ड द्वारा जीवनसंगिनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांना "नॅशनल मायक्रो फायनान्स कॉन्क्लेव २०१४" मध्ये आपल्या कामाचे सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली.देशभरातील महत्वाच्या सक्षम वित्त पुरवठा संस्था, राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्नती अभियानचे देशातील वेगवेगळया राज्यांचे प्रमुख, भारतीय रिजर्व बँकेचे गवर्नर श्री.रघुराम राजन व नाबार्ड बँकेचे अध्यक्ष डॉ. बानवाला यांनी कंपनीचे कामकाज समजून घेतले व ग्रामीण विकासामध्ये उत्पादक कंपन्यांची भूमिका व त्याचा शेतक-यांना होणारा फायदा यावर विचार मंथन करण्यात आले

भविष्यातील वाटचाल:
कंपनीचे स्वत:चे "मार्केटिक आऊटलेट" सुरु करण्याचा मानस आहे. एकाच छताखाली शेतक-याला शेतीसाठी लागणा-या सेवा/वस्तू योग्य दरामध्ये उपलब्ध देणे या हेतूने याची स्थापना करण्यात येत आहे. कृषी विभागाच्याविविध योजनाचा शेतकरी सदस्यांना लाभ देणे समन्वयीत कृषी विकास प्रकल्पामध्ये कंपनीचा समावेश व्हावा म्हणून कंपनीचा प्रयत्न सुरु आहे. के्ेद्रीय छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाच्या उत्पादक कंपनीसाठीच्या विविध योजनामधून समभाग निधी व सपत हमी निधी या योजना मधून लाभ घेणे त्याच बरोबर नाबार्ड यांचे सहकार्याने मायक्रो स्पिन यूनिट उभारण्याचा या महिला शेतकरी उत्पादक कंपनीचा प्रयत्न सुरु आहे.

सारांश :

अल्प व अत्यल्प शेतक-यांना त्यांच्या छोटया शेतीच्या आकारावर व त्यातील उत्पादनाच्या विक्रीवर असलेली बंधने दूर करुन,त्यांच्या सामुहिक प्रयत्नाच्या जोरावर निविष्ठा,साधन,कृषि तंत्रज्ञानाचा वापर व उत्पादित मालाची एकत्रित विक्री संदर्भातील अडचणीवरील सप्रभावी उपाय म्हणून शेतकरी उत्पादक कंपनीच्या बलस्थानाचा उपयोग होऊ लागला आहे. ग्राहक हे बाजारात शेती मालास जास्त किंमत मोजत असले तरी शेतक-यांना मात्र अत्यंत कमी मोबदला मिळत आहे,याचे महत्वाचे कारण म्हणजे शेतीमाल विक्रीतील मध्यस्थांची असणारी लांबच लांब साखळी त्याचप्रमाणे शेतकरी असंघटि असणे हे ही अत्यंत महत्वाचे कारण आहे. या करीता शेतक-यांनी प्रामुख्याने छोटया उत्पादक शेतक-यांनी,शेतकरी उत्पादक कंपनीचा सदस्य होणे आवश्यक असून त्यामुळे सध्याच्या शेती व विपणन व्यवस्थेमधील अडचणी व आव्हांनाना समोरे जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल. शेतकरी उत्पादक कंपनी त्यांच्या सदस्यांना आवश्यक निविष्ठा व सुविधांचा पुरवठा करुन आर्थिक स्थैर्य देण्यास आणि उत्पादन व विपणन यांचा समन्वय साधण्यात महत्वाची भूमिका बजावू शकते. शेतकरी स्वयंसहाय्यता गटांना सुधारीत उत्पान तंत्रज्ञान काढणी पश्चात तंत्रज्ञान,साठवणुक,वाहतूक,बाजार व्यवस्थापनेतील बारकावे यांची माहिती उत्पादक कंपनीच्या निर्मितीतून होऊ लागली आहे.


INDRAPRASTH AGRO TECH

1 comment:

  1. महिला फार्मर प्रोड्युसर कं आणि ईतर शेतकरी उत्पादक कंपनीत फरक आहे का?

    ReplyDelete